सिल्लोड (औरंगाबाद) - मागील वर्षापासून सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक उद्योग व्यवसाय, कारखाने बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत गाव खेड्यातून रोजगारासाठी आलेल्या लाखो नागरिकाच्या नोकऱ्या, रोजगार बंद पडल्याने सर्वांनी पुन्हा 'खेड्याकडे चला' महात्मा गांधीच्या या उपदेशाप्रमाणे खेड्याकडे पावले वळवली आहे. गावात जाऊन अनेक जण शेतात राबत आहे, कोणी मजूरी करून आपली उपजीविका भागवीत आहे. अशा परिस्थितीत सिल्लोड तालुक्यातील भवन येथील गौतम भानुदास हिवाळे हा युवक चांगल्या पगाराची नोकरी गेल्याने आज नारळ पाणी विकून आपली उपजीविका भागवत आहे.
अशी साधली किमया
कोरोनामुळे देशात हजारो उद्योग व्यवसाय बंद पडले होते. लाखो नागरिकाचे रोजगार हिरावले गेले होते. अशा वेळी आपला उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असलेल्या कामगारांनी, नोकरदारांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. कोरोनापासून बचाव करायचा व गावात शेती किंवा दुसरे काम करून आपली व कुटुंबीयांची उपजीविका भागवायची असेल तर आपल्या गावाकडे जाणे हिताचे आहे, असा निर्णय घेत अनेकांनी आपल्या गावातच काम, व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अनेकांना आपला चांगला रोजगार सोडून हातात येईल ते काम करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील गौतम भानुदास हिवाळे हे औरंगाबाद येथे एका मोठ्या नामांकित कंपनीत कामाला होते. चांगला पगारही होता. सर्व जीवन अगदी सुखात सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना कंपनी सोडून गावाकडे यावे लागले. मागील वर्षभरापासून ते गावाकडे आल्याने आता आपली उपजीविका भागवावी कशी असा प्रश्न उपस्थित झाला. या विवंचनेत असताना त्यांना आपण नारळ पाणी विकून आपल्या कुटुंबीयांचा उदार निर्वाह करावा, अशी कल्पना त्यांना सुचली व त्यांनी ही कल्पना कुटुंबीयांना बोलून दाखविली. सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिल्याने त्यांनी भवन येथील रस्त्यावर नारळ पाण्याची हातगाडी सुरू केली. आता नारळ पाणी विकून त्यांना दिवसाकाठी 400 ते 500 रुपये मिळत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह आता सुरळीत झाले आहे.
हेही वाचा -जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प