औरंगाबाद - येथे नशेच्या गोळ्यांच्या चोरट्या विक्री प्रकरणाचे पाळेमुळे कन्नड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री औरंगाबाद येथील अन्न व औषधी प्रशासन व सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कन्नड येथील श्री मेडिकलवर छापा टाकला आहे.
औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रवीण पाथरकर, संजय नंद, देशराज मोरे व इतर यांना 24 एप्रिल रोजी पेट्रोलिंग दरम्यान चेलीपुरा भागात एक व्यक्ती चोरट्या पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार औरंगाबाद येथील खत्री रुग्णालयाजवळ एका जणास नशेच्या गोळ्या विक्री करतांना पकडण्यात आले. यावेळी त्याच्याजवळून 80 स्ट्रीप मधून 1 हजार 770 नशेच्या गोळ्या आढळल्या.
त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी दिली असता, सदर गोळ्या कन्नड येथील श्री मेडिकल येथून आणल्याची त्याने कबुली दिली. त्यानुसार शनिवारी रात्री अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्यासह कन्नड येथील श्री मेडिकलवर छापा टाकला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.