औरंगाबाद - किसान अधिकार दिनानिमित्त औरंगाबाद शहरात काँग्रेस पक्षाने सत्याग्रह आंदोलन केले. आज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत शांततेत बसून सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
केंद्राच्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा आरोप माजी आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केला. भाजपने कायदा शेतकरी हिताचा आहे, असा दावा केला आहे. मात्र, त्यांनी तो सिद्ध केला पाहिजे, असे आवाहन काळे यांनी भाजपला केले.
नवीन कायद्यामुळे शेतीमालाला हमी भाव मिळणार नाही. तो माल सरकार खरेदी करणार नाही. केंद्राचा कायदा अन्यायकारक असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. दरम्यान, केंद्राच्या कायद्यांविरोधात विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस दहा लाख सह्यांचे निवेदन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देणार असून, हे निवेदन त्या राष्ट्रपतींना देऊन शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करतील. अशी माहिती काळे यांनी दिली.
हेही वाचा- मोबाइल नेटवर्कविना हैराण ग्रामस्थांनी गावच काढले विकायला!