औरंगाबाद - भोपाळ लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विरोधात माजी पोलीस अधिकारी निवडणूक लढवणार आहेत. रियाजोद्दीन देशमुख असे या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून रियाजोद्दीन यांनी हुतात्मा एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासोबत काम केले आहे. रियाजोद्दीन हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.
रियाजोद्दीन देशमुख २०१६ साली अमरावती येथून पोलीस सहाय्यक आयुक्त या पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. माजी एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांचे त्यांना खूप चांगले मार्गदर्शन मिळाले होते. ते चांगले अधिकारी असल्याचे रियाजोद्दीन म्हणाले. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत विवादास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. त्यांनी भोपाल येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
करकरेंचा सन्मान देशात असताना भाजपाकडून वीरमरण आलेल्यांचा अपमान केला जात आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी असताना भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याने देशभर संतापाची लाट आहे. महत्त्वाचे म्हणजे भोपाळ मतदार संघात ४८% मुस्लिम मतदार आहेत. रियाजोद्दीन देशमुख यांना मुस्लिम मतदार व अन्य जाती समुहाचा त्यांना पाठींबा मिळत असल्याने भोपाळ निवडणूकीत चुरस वाढली आहे. तर काँग्रेसने येथे दिग्विजय सिंह यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभेची तिंरगी लढत बनली आहे.