औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्ग पाहणी कार्यक्रमात प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले. कार्यक्रम स्थळापासून एक किलोमीटर अंतरावर माध्यम प्रतिनिधींना अडवण्यात आले. कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, असे असताना प्रसार माध्यमांना परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्र्यांना कोरोनाची भीती आहे की, प्रसार माध्यमांची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या आधी प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना...
या आढाव्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, बाजूचे रस्ते (सर्व्हिस रोड), छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आमदार सर्वश्री अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होत्या.