छत्रपती संभाजीनगर: भारतीय शिक्षण प्रसारक मंडळची मराठी प्राथमिक शाळा उस्मानपुरा जवळ ज्योती नगर भागात असल्याचे कागदोपत्री आढळून आले, इतकेच नाही तर शासनाचे अनुदान देखील या शाळेला देण्यात येते. राज्यात बोगस शाळा बाबत तपासणी सुरू आहे. त्यात ही शाळा सुरू नसल्याचे दिसून आले. अनुदानाच्या यादीत बंद असलेली शाळा आली कुठून हा प्रश्न माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम के देशमुख आणि प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांना, शिक्षण संचालक कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी केला.
शाळा मागील बऱ्याच काळापासून बंद: शिक्षणाधिकारी देशमुख यांनी हा प्रकार माध्यमिक विभागात घडलेला नाही असा खुलासा केला. तर शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी प्राथमिक विभागात हा प्रकार घडला असला तरी, त्या शाळेची शिफारस या कार्यालयाकडून झालेली नाही असा अहवाल शिक्षण उपसंचालक मंडळाला पाठवला आहे. ही शाळा मागील बऱ्याच काळापासून बंद होती. या शाळेचा अहवाल कधी पाठवण्यात आला होता याची चौकशी करून संचालक मंडळाला आम्ही अहवाल पाठवू अशी माहिती अनिल साबळे यांनी दिली. या अनुदानाच्या यादीमध्ये सध्यातरी अशी एकच शाळा आहे, जी बंद असताना देखील अनुदानाच्या यादीमध्ये आलेली आहे.ती म्हणजे शहरातील अखिल भारतीय शिक्षण प्रसारक मंडळची मराठी प्राथमिक शाळा आहे.
बंद शाळेला अनुदान कसे? शाळेच्या परिसरामध्ये दोन दिवस पाहणी करण्यात आली. मात्र ही शाळा आणि या शाळेची जागा मिळून आली नाही. स्थानिक नागरिकांना देखील या शाळेबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे बंद शाळेला अनुदान कसे देण्यात आले किंवा ही शाळाच अस्तित्वात नाही अशी माहिती समोर आली आहे. मात्र एकीकडे शिक्षण विभाग सांगते की, ही शाळा मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे. मात्र केव्हापासून शाळा बंद झाली याची माहिती शिक्षण विभागाकडे नाही. ही शाळा मागील काही वर्षा अगोदर कदाचित चालू असावी, त्यामुळे या शाळेचा प्रस्ताव अनुदानासाठी गेला असावा. मात्र याची संचालक मंडळाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करू आणि यानंतर अशा बंद शाळांना अनुदान जाणार नाही याची काळजी घेऊ असे उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.