औरंगाबाद - राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात आता लहान मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. लहान मुलांचे कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंतेची बाब ठरत असल्याने, पालक वर्गात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पाच दिवसांमध्ये तीन बालकांचा मृत्यू
देशात मागील एक वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत असलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध नागरिकांना असलेला धोका अधिक असल्याचं बोललं जातं होतं. लहान मुलांना बाधा होत नसल्याने पालकांमध्ये भीती नव्हती. कुटुंबामध्ये आई वडिलांना जरी कोरोनाचे लागण झाली, तरी देखील अनेकवेळा संबंधित कुटुंबातील लहान मुलांना कोरोनाची लागण होत नव्हती. मात्र मागील एका महिन्यापासून कोरोनाची लागण लहान मुलांना देखील होत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील पाच दिवसांमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 4 बालकांचा मृत्यू झाला आहे.
लहान मुलांमध्ये आढळत नाहीत लक्षणे
लहान मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याचं निष्पन्न होत आहे. मागील महिनाभरात बाधित बालकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, असं असलं तरी लहान मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षण आढळून येत नाहीत. लहान मुलांमधील असलेला विषाणू त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम करत नाही. मात्र त्यामुळे इतर व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लवकरात लवकर आजाराचं निदान करणे तितकंच गरजेचं असल्याचं मत मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी व्यक्त केलं आहे.
लहान मुलांसाठी वेगळी यंत्रणा नाही
लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी देखील लहान मुलांवर उपचार करण्यासाठी वेगळी यंत्रणा नाही. सध्या कोविडसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेतच लहान मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. लहान मुलांना होणारा संसर्ग कशा प्रकारे होत आहे, त्यामुळे नेमक्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात, त्याचे परिणाम याबाबत माहिती घ्यावी लागेल, असं देखील मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शरद पवारांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज