औरंगाबाद - ही निवडणुक फक्त मतांसाठीची नाही, तर ही लढाई आहे राष्ट्रीय अस्मितेची आणि देशाच्या विकासासोबतच सुरक्षेचीही. त्यामुळे कोणी कुठलेही चिन्ह घेऊन लढत असले तरी धनुष्यबाणाशिवाय दुसऱ्या चिन्हाकडे लक्ष देऊ नका. असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केलं. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांच्या जाहीर सभेचे आयोजन औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिर चौकात करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देतांनाच काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो हे ठरवणारी तर ही निवडणूक आहेच, त्याबरोबर राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षेसाठी देखील ही निवडणूक महत्वाची आहे. 55 वर्ष देशात काँग्रेसने भ्रष्ट राजवट राबवली, पण मोदींनी पाच वर्षात परिवर्तन घडवलं. आता कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधींनी पुन्हा गरिबी हटावचा नारा दिला आहे, त्यांना लाज कशी वाटत नाही. आधी त्यांच्या पणजोबांनी, आजोबांनी, आज्जीने, वडिलांनी, आईने आणि आता हे गरिबी हटावचा नारा देतायेत. पण गरिबी हटली नाही, गरीबी हटली ती फक्त यांच्या चेल्याचपाट्यांचीच. असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. कश्मीरमध्ये लष्कराला देण्यात आलेले विशेषाधिकार आणि कलम 124 ए काढण्याची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसला निवडूण देणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केला. काँग्रसेने आपल्या जाहीरनाम्यात कश्मिरातून सैन्य कमी करू, जवानांचे विशेषाधिकार काढू, देशद्रोह्यांवर कारवाई करणारे कलम रद्द करू अशी आश्वासने दिली आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? देशाच्या सुरक्षेसाठी, राष्ट्रीय अस्मितेसाठी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडूण द्या. मग जेव्हा मोदी एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन विकासाच्या दिशेने पुढे जातील तेव्हा त्यांना कुणीही रोखू शकणार नाही असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला.
शाहनवाज हुसेन यांनी हि लढाई साधी नसल्याचं सांगत या निवडणुकीत भारत माता कि जय म्हणणाऱ्यांचा विजय होईल कि भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्याचा ते ठरणार आहे. त्यामुळे भाजप - शिवसेनेलाच मतदान अकरा असे आवाहन शहानवाज हुसेन यांनी केलं.