छत्रपती संभाजीनगर Chhagan Bhujbal On Manoj Jarange : आरक्षण दिलं नाही तर पूर्ण राज्य पेटवून टाकू असं म्हणत लोकांना घाबरवून टाकलं जात आहे. इतर समाजातील लोक सुद्धा राज्यात आहेत हे मराठा समाजाला मान्य नाही. आता तर ज्यांना काही समजत नाही ते अशा विषयावर रान पेटवत आहेत अशी टीका, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर केली आहे. बीडमध्ये घरावर आणि हॉटेलवर जाळपोळ झाली, लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले. पोलिसांच्या देखील गाड्या अडवल्या. तसंच चळवळीला रौद्ररूप धारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं व्यथित झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय.
ओबीसी आरक्षण सहज मिळाले नाही : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत ५८ मोर्चे काढण्यात आले. त्याला आम्ही पण पाठिंबा दिला. समाजासाठी आंदोलन करावी लागतात मान्य आहे. ओबीसी आरक्षण देखील वर्ष-दोन वर्षात मिळालेलं नाही. नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते आणि आम्हाला अजूनही लढावे लागते. त्यांची आरक्षणाची मागणी आहे, तर आमची आमचं आरक्षण टिकवण्याची मागणी आहे. मराठा समाज मुंबईला येणार आहे, कायदा सुव्यवस्थेचा गृहखाते आणि सामान्य लोक विचार करतील. असं नाही की ते आंदोलन करू शकतात आणि ओबीसी मुंबईत धडकू शकणार नाहीत. मुंबईत सव्वा कोटी लोक येतात की, तीन कोटी येतात ते पाहू. कायदा सुव्यवस्था पाहायला पोलीस डिपार्टमेंट आहे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय.
मला भविष्याची चिंता नाही : ओबीसी मेळाव्याला अनेक नेत्यांनी पाठ फिरवली आहे. जे विरोध करत असतील, ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त पाठिंबा देत असतील, त्यांचं देखील ओबीसी जास्त नुकसान करू शकते. मला माझ्या राजकीय भविष्याची, आमदारकीची, मंत्री पदाची परवा नाही. ज्यांना परवा असेल ते विचार करत असतील. माझं नुकसान करून घेण्याची मला हौस आहे म्हणून मी राजकीय नुकसान करून घ्यायला तयार आहे. कोणाला वाटतं देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे. मात्र देशावर सगळ्यांचा अधिकार आहे. एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा. मग ती व्यक्ती असेल, पुढारी किंवा पक्ष असेल. राजकीय नेते आोबीसीसाठी काय निर्णय घेतात याकडं सर्व समाजाचं लक्ष आहे. पक्ष चालवायचं आहे. त्यामुळं नीट विचार करा, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय.
हेही वाचा -