औरंगाबाद - राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री घरातून बाहेर न पडता फक्त मी आणि माझं कुटुंब एवढेच करत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असतील, आमचे भाजपचे नेते पहा आम्ही किती फिरतोय. राजा प्रजेसोबत राहिला पाहिजे. त्यांच्या सुखा-दु:खामध्ये सामील झाला पाहिजे, त्यांचे दुःख माझे दुःख म्हणून वाटून घेतले पाहिजे, त्याला म्हणतात राजा. अन् आपला राजा काय तर आपल्याच कुटुंबात मशगूल झाला असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठणमध्ये केली.
पैठण शहरातील नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर झालेल्या पालखी ओटा परिसर विकसित करणे, या कामासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सूरज लोळगे व नगरसेविका शोभाताई लोळगे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपरिषदेच्या वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून या कामाचा भूमीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडला. सोबत माजी कृषिमंत्री अनिल बोंडे याची उपस्थिती होती.
हेही वाचा - बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
यावेळी मंत्री दानवे यांनी पैठण नगरपरिषदेने केलेल्या कामाचा आढावा घेऊन कौतुक केले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास सततच्या पावसामुळे हातचा निघून गेला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे बांधावर जावून पाहण्याची तसदी घ्या, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर त्यांनी केली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज लोळगे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, तालुका प्रवक्ते अँड कांता बापू औटे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, अश्विनी लखमले, यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.