औरंगाबाद - शहरात अंशतः लॉकडाऊन असताना सुसाट वेगात कार चालवणाऱ्या मोटारचालकाला थांबवून जाब विचारणाऱ्या पोलिसाला मद्यधूंद मोटारचालकाने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 27 मार्च) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाबा चौकात घडली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील पवार, असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्री दहा वाजता सुनील पवार, जालिंदर मांटे दोघे बाबा चौकाकडून क्रांती चौकाच्या दिशेने जात होते. या वेळी एक मोटारचालक उलट दिशेने सुसाट वेगात जात होता. यावेळी सुनील पवार यांना देखील त्याने कट मारला. त्यामुळे पवार यांनी त्याला थांबवले व अशी गाडी का चालवतोय, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने मोटारचालकाने पोलीस गणवेशात असलेल्या पवार यांना मारहाण सुरू केली. तेव्हा तत्काळ मांटे यांनी धाव घेतली. तोपर्यंत पवार यांच्या कानाला गंभीर जखम झाली होती. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती कळाल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी मद्यधुंद कारचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव जावेद पठाण, असे आहे. त्याला तत्काळ क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस ठाण्यात देखील आरडाओरडा केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत बंदी असूनही खासदार इम्तियाज जलील काढणार मोर्चा