औरंगाबाद - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पैसे भरल्याने तक्रारदाराने तक्रार मागे घेतली आहे.
विदेशवारीसाठी उधारीवर 27 तिकिटे काढली. मात्र, 20 लाख 96 रुपये दिले नाहीत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स एजन्सी चालक दानिश शहाब यांनी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन व त्यांचे स्वीय सहाय्यक सुदेश अव्वेकल आणि मुजीब खान यांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच सुदेश यांनी तातडीने पैसे परत केल्याने तक्रारदाराने तक्रार मागे घेतली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये सुदेश यांनी शहाब यांना फोन करून 5 देशांमध्ये जाण्यासाठी विमानाची एकूण 27 तिकिटे काढली होती. नेहमीच संपर्कात असल्याने शहाब यांनी ती उधारीवर बुक करून दिली. अझरुद्दीन यांच्यासह आणखी दोघांची ही तिकिटे होती. परंतु, वारंवार संपर्क करूनही सुदेश यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे शहाब यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अझरुद्दीन यांनी मुजीब खान यांच्यामार्फत विमान तिकिटाचे सर्व पैसे जमा केले. त्यानंतर तक्रारदार शहाब यांनी पोलिसांकडे गैरसमजुतीतून तक्रार दाखल केली होती, असे लिहून देत तक्रार मागे घेतली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.