औरंगाबाद - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पैठणमध्ये आलेल्या संदिपान भूमरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पैठणकरांनी भुमरेंचे जल्लोषात स्वागत केले. भूमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे.
पैठणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला आपले पहिले प्राधान्य राहणार असल्याचे भूमरे यांनी सांगितले. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षी आजच्या तारखेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामाची पायाभरणी झाली होती. हेच औचित्य साधून रविवारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा फुलांनी सजवून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
हेही वाचा - कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आ. भुमरेंचे जन्मभूमीत जल्लोषात स्वागत
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व धर्मीय नागरिकांनी भूमरे यांचा सत्कार केला. माजी मंत्री आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, नगराध्यक्ष सूरज लोळगे, प्रदेश सचिव शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रविंद्र काळे, मराठवाडा साहित्य परिषदचे प्रा. संतोष तांबे, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, माजी जिल्हा परिषद सभापती विनोद तांबे, माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, उद्योगपती संजय पापडीवाल, कल्याण बरकसे यांनी लोकनेते नामदार भूमरे यांच्या राजकीय आणि विकासात्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.