औरंगाबाद - चाकूचा धाक दाखवून दागिन्यांसह एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पैठण तालुक्यातील कारकीन येथे घडली.
कारकीन येथील मुश्ताक शेख यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे रात्री जेवण करुन झोपले. मध्यरात्री ३ वाजता त्यांचा मुलगा झोपेतून उठला असता, त्याला घरातील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने घरातील इतर लोकांना जागे केले.
हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफी प्रकरणी सीआयडी चौकशी करा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
मुश्ताक शेख यांनी संपुर्ण घराची पाहणी केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर घराचा पाठीमागील दरवाजा उघडा होता. सर्व कुटुंबीय एका जागी जमा झाल्यानंतर मुश्ताक यांचा मोठा भाऊ वजीर यांनी सांगितले की, दोन अज्ञात इसमांनी वजीर आणि त्यांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून घरातील दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.