औरंगाबाद - महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शांतीचा अन् समानतेचा संदेश देण्यात आला. सकाळपासूनच बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी बुद्ध लेणी परिसरात गर्दी केली होती. तसेच आज शहरात विविध उपक्रमांनी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध सामाजिक संस्थेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठ परिसरातील बुद्ध लेणीत त्रिसरण पंचशील ग्रहण करून पूजन करण्यात आले. ‘बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघम शरणं गच्छामी’ या पंचशिलाने परिसरात मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
मंगलमैत्री हा कल्याणाचा मुख्य मार्ग आहे. तो आत्मसात करण्यासाठी कुठल्याही भांडवलाची गरज नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मंगलमैत्रीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असा संदेश भदंत बोधीपालो महाथेरो यांनी धम्मदेशनेतून केला. बुद्ध जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शेकडो अनुयायांनी गर्दी केली होती.
सकाळपासूनच उपासक व उपासिका पांढरे वस्त्र व हातात पंचशिल ध्वज घेवून लेण्यांच्या पायथ्याशी आले होते. येथे बुद्ध जयंतीनिमित्त प्रज्ञा, प्रसार धम्म संस्कार केंद्रातर्फे सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्याहस्ते धम्म ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपासकांसाठी खीरदान करण्यात आले. यावेळी २२ प्रतिज्ञांचे वाचन,पठण आणि महापरित्राण पाठ करण्यात आला. यावेळी श्रामणेर संघामध्ये सहभागी झालेल्या श्रामणेरांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बुद्ध जयंतीनिमित्त लेण्यांचा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धमुर्ती, धार्मिक पुस्तकांचे स्टॉल लागले होते.