छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे 24 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. आमखास मैदान येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले. गेल्या काही वर्षात पक्षाने तेलंगणा येथे केलेले काम चर्चेत आहेत. त्याचा फायदा घेत महाराष्ट्रात देखील पक्षाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
हैद्राबादचा दुसरा पक्षही महाराष्ट्रात : 2014 निवडणुकीपूर्वी हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. त्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी नांदेड महापालिकेमध्ये जोरदार प्रदर्शन करत महाराष्ट्रात एन्ट्री केल्याचे दाखवून दिले होते. यानंतर या पक्षाचे आज घडीला महाराष्ट्रात दोन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत. त्याच धर्तीवर आता हैद्राबाद येथील दुसरा पक्ष भारत राष्ट्र समिती देखील नांदेडमार्गेच महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष केसीआर हे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेत आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एमआयएम पक्षाला आलेले यश बघता बीआरएसला देखील अशा प्रकारे यश महाराष्ट्रात मिळेल का? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
सभेपूर्वीच अनेकांचा पक्षप्रवेश : 24 एप्रिलला केसीआर यांच्या नियोजित सभेपूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे सभेपूर्वीच हा पक्ष काही प्रमाणात जिल्ह्यात मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर सभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नगरसेवक माजी आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती बीआर एस पक्षाचे खासदार बी.बी. पाटील यांनी दिली.
'या' नेत्यांनी केला जाहीर प्रवेश : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार आणि नेहमीच चर्चेत राहणारे हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातून बीआरएस मध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष कदीर मौलाना, शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे पुत्र संतोष माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे बीआरएस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात मोठे नेते असलेले अभय चिकटगावकर काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन न रमल्याने आता त्यांनीही बीआरएस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएसची व्याप्ती : एकंदरीतच या दिग्गज नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएस पक्षाची मोठ्या प्रमाणात व्याप्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता 24 तारखेला होणाऱ्या सभेतही मोठ्या प्रमाणात नगरसेवक, माजी आमदार, मोठमोठे पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार असल्याने आगामी काळात बीआरएस पक्ष एक, नवा सक्षम पर्याय म्हणून छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी उपलब्ध झाला आहे का? अशी चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे.