छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : काही महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये सभा घेऊन बीआरएस पक्षाने आपले नाव चर्चेत आणले. राज्यात दुसरी जाहीर सभा तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव घेत आहेत. सभेपूर्वीच अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढायला सुरुवात झाली, असे बोलले जात आहे. तेलंगना राज्यात शेतकरी आणि नागरिकांना दिलेल्या सुविधांमुळे तेलंगणा मॉडेल सर्वच राजकीय पक्षांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळेच इतर पक्षातील माजी आमदारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.
दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मौलाना कदिर, वैजापूर येथील भाजपाचे पदाधिकारी अभय पाटील चिकटगावकर, शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, कैलास तवार अशा दिग्गज नेत्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. तर सभेच्या ठिकाणी काही पक्षातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते जाहीर प्रवेश करतील अशी माहिती पक्षातील नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे सभा सुरू होण्याच्या आधीच पक्ष चांगला चर्चेत राहिला आहे. आता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नेमके आपल्या भाषणात कोणते मुद्दे घेऊन पुढे जातील? हे पाहण्यासारखे असणार आहे.
सभा स्थळ बदलले : बीआरएस पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांची सभा शहरात होणार याबाबत पक्षाच्या नेत्यांनी दीड महिना आधी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मध्यभागी असलेले आमखास मैदान येथे सभा होईल, असे घोषित देखील केले. नियोजनाच्या दृष्टीने हे मैदान योग्य नाही, असे कारण पोलिसांनी देत त्या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी दिली नाही. त्या बदल्यात इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना पोलिसांनी दिली दोन मैदानही सुचविण्यात आले. मात्र मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ती स्थळ मान्य केली नाहीत.
सभेची जय्यत तयारी : परिणामी बीड रस्त्यावरील जबिंदा मैदान निश्चित करण्यात आले. पोलिसांनी देखील तिथे सभा घेण्यास परवानगी दिली, त्यानंतर तातडीने सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. त्यासाठी शहरात आठवडाभर जोरदार प्रचार करण्यात आला. बऱ्याच वर्षांनी निवडणुकीला उशीर असताना राज्य बाहेरील पक्षाचे ध्वज रस्त्यावर लावत प्रचार सुरू केला. त्यामुळे या सभेची चर्चा गल्ली ते दिल्लीत रंगली आहे.
वाहतुकीत मोठे बदल : बीआरएस पक्षाची जाहीर सभा सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू होईल. या सभेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे दोन दिवस आधीच शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून अनेक नेते कार्यकर्ते सभास्थळी दाखल होतील, त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी पाच ते रात्री दहा या काळात शहानूरमीया दर्गा ते गोदावरी टी पॉइंट हा मार्ग रहदारीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी नागरिकांनी इतर ठिकाणहून रस्ता वापरावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले. तर बीड रस्त्यावरील सातारा परिसर येथे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेवर कार्यकर्त्यांच्या वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, ही सभा भव्य दिव्य करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसून आले.