औरंगाबाद - सख्ख्या बहिणीचे दागिने चोरणाऱ्या भावाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने चोरलेले दागिनेही पुण्यात राहणाऱ्या त्याच्या मित्राच्या घरातून जप्त केले आहे.
जोगेश्वरी येथे राहणाऱ्या समशेरखान मैनुद्दीनखान यांच्या घरात त्यांचा मेव्हणा नरूल हसन मुस्तफाखान (वय 23 वर्षे) हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून राहतो. समशेरखान मैनुद्दीनखान यांच्या पत्नीने त्यांचा जवळील साडेसत्तावीस ग्रॅमचा सोन्याचा हार, पावणे नऊ ग्रॅमचे झुमके तसेच पाच ग्रॅम वजनाची अंगठी एका डब्यात भरून तो डबा कपाटामध्ये ठेवला होता. हे नरूल हसन याला माहीत असल्याने त्याने 25 जानेवारी रोजी संधी साधून कपाटातील दागिने चोरले. त्यानंतर ते दागिने आईचे असल्याचे सांगून ते पुण्यात राहणाऱ्या मित्रांकडे नरूलने ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबाद महापालिकेच्या आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का
याप्रकरणी 29 जानेवारी रोजी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सुरू असताना पोलिसांना नरूल हसन मुस्तफाखानवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुली देत सोने पुण्यात असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी पुण्यातून दागिने जप्त केले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल चासकर व त्यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - लग्नासाठी बाहेरगावी गेल्यावर भरदिवसा चोरी; पाळत ठेऊन 'हात साफ' केल्याचा संशय