औरंगाबाद - शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बन्सीलाल नगरमध्ये अज्ञात माथेफिरूंनी ५ कार फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे वाहन मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी अज्ञात ३ जणांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बन्सीलाल नगर येथे शनिवारी मध्यरात्री माथेफिरुने धुडगूस घालून ५ वाहनांच्या काचा फोडल्या. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. बन्सीलाल नगर येथील रहिवासी रामराव पांडुरंग शहाणे यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री त्यांच्या निवासस्थानासमोर त्यांची कार (एम एच २०- ४७७०) ही उभी केली होती. रात्री माथेफिरुंनी त्यांच्या कारवर दगड मारून काचा फोडून नुकसान केले. रविवारी सकाळी शहाणे कुटुंब झोपेतून उठले तेव्हा त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी त्यांच्या कॉलनीतील लक्ष्मीनारायण चंद्रभान, सतीश माधवराव देशमुख, किशोर बजाज, आणि रोहिंद्र देवेंद्रलाल मारिया यांच्या कारवर दगड मारल्याचे समोर आले.
एकाच कॉलनीतील ५ वाहनांचे माथेफिरू नुकसान केल्याचे कळताच परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता ३ माथेफिरुंनी ही तोडफोड केली असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये हे तीनही आरोपी दिसत आहेत. मात्र, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. पोलीस या तिघांचा शोध घेत आहे. याप्रकरणी रामराव शहाणे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.