औरंगाबाद - भाचीच्या हळदी समारंभात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला, की एका भावाने दुसऱ्या भावाच्या छातीत चाकू मारून त्याची हत्या केली. ही घटना शुक्रवारी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली. आकाश मारोती शेळके (२०) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबई येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात जुना वाद होता. आकाश सेन्ट्रींगचे काम करत होता, तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकतो. या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे सुरू होता. त्यात दोघांच्या नाचण्यावरून पुन्हा वाद झाला. दरम्यान या घटनेनंतर जखमी आकाशला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुंबईतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या -
आकाशची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन पसार झाला होता. तो नवी मुंबई येथील वाशी येथे लपून बसला असल्याची माहिती खबऱ्याच्या मदतीने पोलिसांना मिळाली. एमआयडीसी सिडको पोलिसांच्या एका पथकाने वाशी येथे सापळा रचत आरोपी सचिन शेळकेच्या मुसक्या आवळल्या. आज संध्याकाळपर्यंत त्याला औरंगाबादेत आणले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाले यांनी दिली.