सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील कोरोनाच्या उपाय योजना करण्यासंदर्भात दि ३ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.
काय आहेत मागण्या?
- सिल्लोड सोयगाव तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे मंजूर असलेल्या कोविड सेंटरचे बांधकाम त्वरित पूर्ण करून तेथे कोविड सेंटर सुरू करावे.
- दोन्ही तालुक्यातील सुमारे ३०० पदे रिक्त आहे, ते तत्काळ भरावे.
- प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रुग्णवाहिका देण्यात यावी.
- सोयगाव शहरासाठी त्वरित रुग्णवाहिका देण्यात यावी.
- तसेच जरंडी व शिवना येथील वर्षभरापासून मंजूर असलेली ऑक्सीजन लाईन तत्काळ सुरू करावी.
- रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाची चौकशी करावी.
- शासकीय साहित्य खाजगी ठिकाणी गेले आहे त्याचे ऑडिट करावे.
- लसीकरण बाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- दोन्ही तालुक्यामध्ये एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, ते तत्काळ उपलब्ध करुन द्यावे.
मागण्यांसाठी ८ दिवस अगोदरच दिले होते निवेदन
दि ३ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. परंतु उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन कोविड रुग्णालय, व सोयगाव शहरासाठी रुग्णवाहिका, तर जरंडी व शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये ऑक्सिजन लाईन हे आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. या मागणीसाठी ८ दिवस अगोदर निवेदन दिले होते.
ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
तालुक्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी चांगली सेवा बजावीत असले तरी त्यांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. दोन्ही तालुक्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोविड रुग्णालयाचे बांधकाम १ वर्षांपासून सुरू आहे. ते काम लवकर झाले असते तर तालुक्यातील ५० रुग्णांचा जीव गेला नसता. काम पूर्ण करण्याची मुदत १ महिना होती. परंतु, वर्ष झाले तरी काम पूर्ण झाले नाही. बांधकामासाठी झालेल्या विलंबास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तर भाजपा करणार टाळे ठोक आंदोलन
'दोन्ही तालुक्यात यावर्षात सुमारे ५० रुग्ण मृत झाले आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे. दोन्ही तालुक्यामध्ये एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. त्यामुळे ५० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. फक्त मोठ्या गोष्टी सुरू आहेत. आमच्या मागण्या ८ दिवसात पूर्ण झाल्या नाही, तर आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करू', असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.
लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत आंदोलन
या आंदोलनात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया माजी नगरसेवक सुनिल मिरकर यांचा समावेश होता. यावेळी लॉकडाउनच्या नियमांप्रमाणे प्रतिनिधीक स्वरूपात ५ पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले.
हेही वाचा - आधारविना भटके-विमुक्त लसीकरणापासून वंचित राहणार? मुनींप्रमाणे विमुक्तांसाठी बंधन शिथील करण्याची मागणी