औरंगाबाद - कोविडच्या नावावर राज्यातील मंदिरं बंद केली आहेत. हा निर्णय म्हणजे भाविकांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे, असा आरोप करत भाजप अध्यात्म आघाडीच्या वतीने घृष्णेश्वर मंदिरासमोर प्रतिकात्मक पूजन करून आंदोलन करण्यात आले. पुढच्या सोमवारपर्यंत धार्मिकस्थळं सुरू केली नाहीत, तर राज्यभर जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा अध्यात्म आघाडी अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला.
'बार उघडले, मग मंदिर का बंद?'
'राज्यात कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता मागील दीड वर्षांपासून राज्यातील धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर दारूची दुकानं, बार, हॉटेल, मॉल सर्व सुरू करण्यात आले आहे. मग धार्मिक स्थळं का बंद ठेवली आहेत? इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना पसरत नाही, फक्त धार्मिक स्थळी येणाऱ्या भविकांमुळेच कोरोना पसरतो का?', असे प्रश्न भाजप अध्यात्म आघाडीने उपस्थितीत केले.
अनेकांचे रोजगार गेले
'धार्मिक स्थळं बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहेत. मंदिर परिसरात छोट्या छोट्या व्यवसायिकांचे पर्यटक आणि भाविकांमुळे पोट भरते. मात्र, त्यांचा विचार न करता ठाकरे सरकारने धार्मिक स्थळं बंद ठेवली आहेत. धार्मिक स्थळांवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. याबाबत सरकार विचार करत नाही. या लोकांना मदत करणार कोण? त्यांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे. मात्र, तसे होत नसल्याने भाजप अध्यात्म आघाडीने आंदोलन सुरू केले', असे भाजप अध्यात्म आघाडी अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले.
प्रत्येक श्रावण सोमवारी आंदोलनाचा इशारा
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावणात लाखो भक्त दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र मागील दीड वर्षांपासून भक्तांना बंद दरवाज्याचे दर्शन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी आंदोलन करत असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. पहिले आंदोलन नाशिक येथे झाले. तर दुसरे आंदोलन घृष्णेश्वर मंदिरात करण्यात आले. पुढील एक आठवड्यात धार्मिक स्थळं सुरू नाही केली गेली तर राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी दिली.
हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी