छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाविकास आघाडीच्या सभा मैदानात भाजपने गोमूत्र शिंपडून आंदोलन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले मैदान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत सभा घेऊन अपवित्र केले असल्याने, ते शुद्ध करत असल्याच भाजपतर्फे सांगण्यात आले. तर कार्यकर्त्यांनी संपूर्ण मैदानात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
याच मैदानात बाळासाहेबांनी केला होता विरोध: शहरातील मध्यवस्तीत असलेला सांस्कृतिक क्रीडामंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमुळे अनेक वेळा गाजले. याच मैदानात अनेक मोठ्या सभा त्यांनी घेतल्या. इतकच नाही तर 1988 मध्ये महानगरपालिका ताब्यात आल्यावर, याच मैदानात त्यांनी पहिल्यांदा शहराचे नामकरण करून संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. त्यांच्या भाषणात अनेक वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करत टीका केली. याच मैदानात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेत महाविकास आघाडीची सभा घेतली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झाले आहे. ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची नाळ बांधली, त्याच ठिकाणी यांनी सभा घेत अपवित्र केले, असा आरोप भाजप पदाधिकारी सुहास दशरथे यांनी केला.
रविवारी झाली सभा: महाविकास आघाडीच्यावतीने सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते सभेला आले होते. सभास्थळावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्याचे काम करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकार्यक्षम असल्यास ठपका सभेमध्ये ठेवण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने उद्धव ठाकरे अपवित्र झाल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. महाविकास आघाडीचे नेते मैदानावर आल्याने शहराचे वातावरण अपवित्र झाले. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी मैदानावर गोमूत्र शिंपडून मैदान शुद्धीकरण करत असल्याच भाजप युवा पदाधिकारी हर्षवर्धन कराड यांनी सांगितले.