औरंगाबाद - शेतकऱ्यांसाठी केलेला कायदा फायद्याचा आहे. मात्र, विरोधक विरोधाला विरोध करत आहेत. तर काही राज्यांमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेत विरोध करत असल्याचा आरोप भाजपा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. तसेच भाजपा नेते आता ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांची कंपनी तयार करता येईल का? आणि त्या माध्यमातून त्यांना थेट गावात कसा त्याचा फायदा करून देता येईल? याबाबत लक्ष देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला तसा पहिल्यांदाच मोठा बदल घडला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान मोदींजींनी आत्मनिर्भर भारत योजनेत मदत देण्याची घोषणा केली. त्यात जर शेतकऱ्यांनी स्वतःची कंपनी तयार केली तर त्यासाठी कर्ज मिळू शकते. विरोधक राजकारण करण्यासाठी विरोध करत आहेत. हे देशासाठी क्रांतिकारी पाऊल मानले जाईल. स्वामिनाथन आयोग काँग्रेसने उघडून देखील पहिला नव्हता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासपूर्वक हा कायदा लागू केला.
देशातील ज्या शेतकरी संघटना विरोध करत आहेत त्या कोणत्या तरी पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून तो विरोध आहे. राजू शेट्टी त्याचाच एक भाग आहे. मात्र, शेतकरी हुशार आहेत त्यांना कायदा आपल्या फायद्याचा आहे, हे माहीत असल्याने त्यांचा विरोध नाही आहे, असेही कराड यांनी यावेळी सांगितले.
तसेच खासगी कंपन्या थेट शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊ शकतील आणि त्याचा मोबदला त्यांना तीन दिवसांमध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरण्याचे काम नाही, असेही कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.