औरंगाबाद : नेतेमंडळीच्या नाराजी नाट्यात ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची पूजा पार पडली. दिलेल्या वेळेच्या आधी आरती सुरू झाल्याने भाजप आमदार अतुल सावे संतप्त झाले. पूजा झाल्यावर त्यांनी आयोजकांना जाब देखील विचारला. त्यावेळी त्यांची माफी मागितल्यानंतर राजकीय नाराजी नाट्य शमले आणि वाद झालाच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला.
शिवसेना नेत्यांनी केली आरती सुरू
10 सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सुरू झाली. यावेळी सेना आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह गणेश महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी वीस मिनिटांनी भाजप आमदार अतुल सावे हे देखील मंदिरात दाखल झाले. त्यांनी देखील आरतीत सहभाग घेतला. मात्र नंतर मला अकराची वेळ देऊन लवकर आरती कशी सुरू केली? असा प्रश्न देखील सावे यांनी उपस्थित केला. मात्र त्यावेळी संस्थान गणपतीचे विश्वस्त प्रफुल्ल मालानी यांनी सावे यांची माफी मागत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. नंतर चंद्रकांत खैरे आणि आमदार दानवे यांनी सावेंची समजूत काढून वाद संपवला.
साधेपणाने पार पडला सोहळा
संस्थान गणपती म्हणजे शहराचे ग्राम दैवत. प्रत्येक वर्षी शहारातील सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात संस्थान गणेशाच्या पूजनाने केली जाते. दरवर्षी बँड, ढोल-ताशे, लेझीम असा भव्य कार्यक्रम केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने सोहळा साजरा केला जात आहे. सामाजिक उपक्रमात कोरोना जनजागृती केली जात असल्याचं विश्वस्त मंडळाने सांगितलं. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट जाऊ दे आणि पुन्हा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करायला मिळू दे, अशी मनोकामना यावेळी उपस्थितांनी संस्थान गणपती समोर व्यक्त केली.
हेही वाचा - गणेशभक्ताकडून दगडूशेठ गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण