औरंगाबाद - शेतकऱ्याच्या मुलांना आदित्य ठाकरे प्रमाणे समजावे आणि शेतकऱ्यांना कुटुंबातील घटक समजावे तरच मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत करू शकतील, असा टोला माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके ही आता पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी दिलेला शब्द पूर्ण करत बागाईत शेतकऱ्यांना 50 हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत करावी, अशी मागणीही बोंडे यांनी यावेळी केली.
हेही वाचा - आनंदाची बातमी...! स्पुटनिक कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास हिरवा कंदील
आताच्या राज्यकर्त्यांनी सत्तेत येण्याआधी दिलेल्या घोषणांचे स्मरण करून घोषणांची पूर्णता करावी. आताचे राज्यकर्ते हे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' यातच गुंतलेले आहे, असा टोलाही बोंडे यांनी लगावला. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचादेखील विचार करावा. सरकारला विनंती केली, मुख्यमंत्री महोदय हे गजनी चित्रपटातील आमिर खान सारख्या स्थितीत आहे, अशी टीका बोंडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना आदित्य ठाकरे यांप्रमाणे समजावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी बोंडे यांनी केली.