औंरगाबाद - भाजप हा खोट्या लोकांचा पक्ष आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पदवीधर असल्याचे प्रतिज्ञापत्र नमूद केले होते. मात्र, यावेळी त्यांनी १२वी उतीर्ण असल्याचे नमूद केले आहे. यावरून सावंतानी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
भाजपने खोटं बोलणाच्या कळस गाठला आहे. या पक्षाची निर्मिती खोट्यातून झाली असल्याचे ते म्हणाले. स्मृती इराणी यांनी शिक्षण क्षेत्राची वाताहत केली आहे. कुठलेच प्रश्न गांभीर्याने सोडवले नाही. कमी शिकलेली व्यक्ती या सरकारने शिक्षणमंत्री म्हणून नेमणूक करणे दुर्दैव असल्याचे देखील सचिन सावंत म्हणाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारासाठी सचिन सावंत औरंगाबादेत आले होते.
भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईचे श्रेय भाजप लाटत आहे. प्रत्येक सभेत भाजप सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्यावर मते मागत आहे. ही विचारधारा हीन असून हा हीन लोकांचा पक्ष आहे, असा आरोप देखील सावंतांनी यावेळी केला. सध्या भाजपमध्ये काय अवस्था आहे हे जळगाव मध्ये दिसून आले. मंत्रीच जर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण करत असेल तर 'मेरा बुथ सबसे मजबूत, ऐवजी मेरा बूट सबसे मजबूत', असे घोषवाक्य भाजपचे असायला पाहिजे.
सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार दुष्काळाच्या उपाययोजना करण्यात अपयशी पडले आहे. अशा भाजप सरकारला सत्तेतून खाली उतरवायचे आहे. काँग्रेस भाजप विरोधात जोरदार प्रचार करणार असून आगामी काळात महाराष्ट्रातील आणि देशातील जनता ही काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास देखील सचिन सावंत यांनी व्यक्त केला.