औरंगाबाद - टाळेबंदी रद्द झाल्याच्या घोषणेनंतर संचारबंदी असतानाही खासदार इम्तियाज जलील यांनी मिरवणूक काढली आणि नियमांचे उल्लंघन केले. या खासदारांवर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सिटी चौक पोलिसांना निवेदन देण्यात आले. आज सात वाजण्याच्या आत गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला.
टाळेबंदीविषयी भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका मांडली आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घातला व त्यांना वस्तुस्थिती सांगितली. यानंतर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी रद्द केली. मात्र, याचे श्रेय खासदार इम्तियाज जलील यांनी घेतले, एवढेच नव्हे तर संचारबंदीचे उल्लंघन करत मिरवणूकही काढली. यात नियमांचे उल्लंघन झाले आहे. खासदारांसह कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत मास्क परिधान केला नव्हता, त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. याच मागणीसाठी आम्ही भाजप पदाधिकाऱ्यांसह थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल झालो आहोत. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचा इशाराही दिला. सायंकाळी सात वाजेपर्यंत जलील व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपने दिला आहे.
सरकार आणि एमआयएम मिली भगत...
नियम न पाळल्यास सर्वसामान्यांवर कारवाई होते. भाजप कार्यकर्त्यांनी विरोधात बोलल्यानंतर त्यांना अटक होते. मात्र, खासदारांनी नियमांचे उल्लंघन केले, तर साधा गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला नाही. सरकार आणि एमआयएम यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोपही संजय केनेकर यांनी केला. त्यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे माजी उपमहापौर राजू शिंदे, समीर राजूरकर राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, शिवाजी दांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.