औरंगाबाद - रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या पीपीई कीट रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार औरंगाबादमधे उघडकीस आला. वाळुंज भागात मेडिकल वेस्टच्या माध्यमातून पीपीई किट रस्त्यावर फेकून दिल्याची घटना ताजी असताना आता चिखलठाणा बाजाराच्या कचरा कुंडीत पीपीई कीट फेकल्याचे आढळले.
नागरिकांच्या तक्रारींनुसार चिखलठाणा येथील कचरा कुंडीत मेडीकल वेस्ट फेकणाऱ्या महानगरपालिकेच्या काही गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. मनसे कार्यकर्त्यांनी मेडीकल वेस्ट असलेल्या गाड्या रिकाम्या करण्यास मना केले. महानगरपालिकेचा गलथान कारभार त्वरित थांबवला नाही तर मनसे कार्यकर्ते आपल्या पद्धतीने त्यांना जाब विचारतील, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. तर रुग्णालयातून आम्हाला कचरा बांधून दिला जातो. त्यामुळे कचऱ्याच्या पिशव्यामध्ये नेमक काय असते? याबाबत आम्हाला माहिती नाही, असे उत्तर सफाई कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी दिले.
गुरुवारीदेखील वाळुंज परिसरात असाच प्रकार समोर आला. रुग्णालयातील पीपीई कीट, ग्लोव्हज्, इंजेक्शन, औषधे असा बायोमेडिकल वेस्ट वाळुंज परिसरातील उघड्यावर टाकला होता. नागरिकांनी तक्रार करताच पोलीस आणि आरोग्य विभागाकडून त्याची पाहणी करण्यात आली. बजाजनगर परिसरातील शनी मंदिर जवळच्या मोकळ्या जागेत रुग्णालयातील कचरा टाकण्यात आला होता. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वापरत असलेले काही साहित्य एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवल्याचे त्या ठिकाणी दिसले.
कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना आरोग्य यंत्रणा मात्र, आपल्या भोंगळ कारभाराला आवर घालण्यास असमर्थ दिसत आहेत. रुग्णालयातील कचरा कुठलीही प्रक्रिया न करता रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. फेकलेल्या वैद्यकीय कचऱ्यामुळे कोणाला बाधा झाली तर, याला जबाबदार कोण? हा प्रश्न औरंगाबादमध्ये उपस्थित होत आहे.