औरंगाबाद - पैशासाठी भावानेच भावाची हत्या केल्याची घटना पैठणमध्ये घडली. लहान भावाकडे सतत पैशासाठी येणाऱ्या मोठ्या भावाने गावाकडे घर बांधण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यातून मोठ्या भावाने धारधार शस्त्राने लहान भावाची हत्या केली. त्यानंतर मोठा भाऊ तिथून पसार झाला.
सुर्यप्रकाश ठाकूर (वय-53, रा.परितोष विहार, जवाहरनगर) असे मृत लहान भावाचे नाव आहे. तर वेदप्रकाश ठाकूर (वय-56, रा.पैठण) असे लहान भावाची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, सूर्यप्रकाश आणि वेदप्रकाश हे दोघे सख्खे भाऊ आहेत. वेदप्रकाश काहीही काम धंदा करत नाही, तो सुर्यप्रकाशकडे नेहमी पैश्यांची मागणी करण्यासाठी येत होता. सध्या वेदप्रकाश हा पैठण येथे राहतो, तर मृत सूर्यप्रकाश हा रिलायन्स मॉलसमोर राहत होता. तो एका कंपनीमध्ये काम करत होता. शुक्रवारी साडे आठच्या सुमारास मोठा भाऊ वेदप्रकाश हा सुर्यप्रकाशच्या घरी आला. दोघेही घरात बसले, घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता आहे, मला दे अशी लहान भावाकडे वेदप्रकाशने पैशाची मागणी केली. चहासाठी घरातील दूध संपल्याने सूर्यप्रकाशची पत्नी आशा ठाकूर दूध आणण्याससाठी तिसऱ्या मजल्यावरील राहणाऱ्या एक ओळखीच्याकडे गेल्या. त्यावेळी वेदप्रकाशने सातत्याने पैश्याची मागणी सुरू ठेवली, सुर्यप्रकाश यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. राग अनावर झाल्याने वेदप्रकाशने सुर्यप्रकाशवर धारदार सुऱ्याने वार करण्यास सुरुवात केली. सुर्यप्रकाश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडताच वेदप्रकाशने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून घरातील भावाचे कपडे घालून घराची कडी लावून पसार झाला.
काम करणाऱ्या बाईने वेदप्रकाशला पायरीवरून पळताना पाहिले. तिला संशय आल्याने तिने अशा ठाकूरला सांगितले. दोघींनी घरात जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात सुर्यप्रकाश जमिनीवर पडलेला होता. त्याला तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पैठण येथून घेतले ताब्यात
खून करून पसार झालेल्या वेदप्रकाश ठाकुरला अवघ्या काही तासातच जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. पैठण येथे त्याला जेरबंद करण्यात आले.