औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा असली, तरी अशोक चव्हाणांसह काही लोकांना मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना सोबत घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना सोबत न घेता, चांगल्या लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच मराठा अरक्षणासोबत मुस्लिम आणि धनगर आरक्षणाची मागणीही यावेळी संघटनेने केली. गरीब ब्राम्हण समाजालादेखील न्याय मिळावा, यासाठी संघटना आग्रही असल्याचेही ते म्हणाले.
नाव न घेता शरद पवारांवर टीका -
विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाज तुमच्यामागे उभा राहिला, त्यांच्या जीवावर राजकारण केले. आज पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत आहात. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय केले. घरचे प्रश्न सोडवताना विविध समाजाचे प्रश्न का सोडवले नाहीत. या प्रश्नांकडे लक्ष द्या, अन्यथा लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विनायक मेटे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली.
अशोक चव्हाण यांच्या हट्टामुळे युवकांना संधी नाही -
अशोक चव्हाण आणि त्यांच्या बाजूला असलेल्या लोकांनी राजकारण केल्याने मराठा समाजावर वाईट परिस्थिती आली आहे. समाजात अशोक चव्हाण यांच्यावर रोष असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना बोलावण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनी चांगले निर्णय घेतले, मात्र हे निर्णय आम्हाला डावलून घेतले. असे चव्हाण आणि चमुला वाटते. म्हणून आमच्याबाबत काही चुकीच्या बातम्या पेरल्या, असा आरोप देखील मेटे यांनी केला.
संभाजीनगरचा मुद्दा सामनामधून ठरवू नका -
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, या मागणीवरून राजकारण केले जात आहे. नाव बदलणे हा विषय सर्वस्वी शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. ती भूमिका सामनामधून किंवा सीएमओच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर करू नये. त्यांचे नोटिफिकेशन काढावे. त्यानंतर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची भूमिका विचारावी. त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर शिवसेना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार की, सत्तेची लाचारी स्वीकारणार हे बघायला मिळेल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा काढला जात आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करू नका, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणाबाबत गप्प का? -
सरकारमध्ये कोणीही मुस्लीम आरक्षणावर बोलायला तयार नाही. कोणताही मुस्लीम आमदार आरक्षणाचा उच्चार करायला तयार नाहीत. शिवसेनेचा अजेंडा वेगळा आहे. त्यांचा विषय नाही. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणावर का बोलत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांचे मेळावे आणि बैठका घेतल्या. मात्र, मुस्लीम आरक्षणाबाबत शब्द काढायला का तयार नाहीत. याचा मुस्लीम समाजाने विचार करावा, असेही विनायक मेटे यांनी म्हटले.
सन्मान मिळाला तर युती -
आम्ही भाजपसोबत असलो तरी आगामी असलेल्या निवडणुका शिवसंग्राम संघटना लढवेल. सन्मान मिळाला तर युतीत लढू नाही, तर संघटना स्वबळावर निवडणूक लढवेल. औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक शिवसंग्राम लढवेल आणि त्यात दोन आकडी जागांवर विजय मिळेल, अशी खात्री आहे. याच महिन्यात औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेऊ. त्याच बरोबर 20 जानेवारी नंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठक घेऊन कार्यकारिणीत बदल होतील, अशी भूमिका विनायक मेटे यांनी स्पष्ट केली.
शिवसंग्रामने सर्वसामान्यांसाठी केले काम -
19 वर्षात अनेकांचा विरोध सहन करावा लागला. कधी जातीमुळे तर कधी वयक्तीक विरोध झाला. ज्यांच्यासाठी लढा दिला, ते देखील विरोधात आले. मात्र, छत्रपतींच्या विचारांना घेऊन शिवसंग्राम संघटनेने आपला विचार पुढे नेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावावर काही अनेकांनी राजकारण केले. तर कोणी अर्थकारण केले. काहींनी सत्ता मिळवली. मात्र, आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम केले. माोत्र, त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम कोणी केले नाही, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - 'बालकांचे मृत्यू नाही तर हत्याच' ; याला सरकारच जबाबदार असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप