औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विद्युत अभियांत्रिकी परीक्षेत औरंगाबादची शामल बनकर राज्यात चौथी तर महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य अभियंता पदावर तिची निवड झाली आहे. एका रिक्षाचालकाच्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र शामल वर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
अथक परिश्रमातून मिळवले यश -
शामल बनकर तिचे वडील रिक्षाचालक आहेत तर आई पोळ्या लाटण्याचे काम करते. अथक परिश्रमातून त्यांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात कष्टाचं चीज झाल्याचं पाहायला मिळाले. सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता विद्युत गट ब, श्रेणी-2 या संवर्गातील 16 पदांसाठी 24 नोव्हेंबर 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. शामलने मुंबई केंद्रावर मुख्य परीक्षा दिली. त्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत शामल बनकर हिने राज्यभर बाजी मारली. शामल ही राज्यात चौथी तर महिलांमध्ये पहिली आली आहे.
हेही वाचा - अफगाण विद्यार्थ्यांबरोबर राज्य सरकार खंबीरपणे उभे - मंत्री उदय सामंत
सर्वांची साथीने मिळवले यश -
शामलच्या घरी दोन भाऊ आहेत. त्यातील एक भाऊ शामलप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. शामल यूपीएसीची तयारी करत असताना तिने एमपीएस परीक्षेला अर्ज भरला. रोज अभ्यासाचे नियोजन करून मेहनत केल्याने यश मिळाले असल्याची माहिती शामलने दिली. मित्र मंडळी, नातेवाईक यांनी साथ आणि मदत दिल्यामुळे यश मिळाले असून यापुढे यूपीएससीची तयारी करणार असल्याचे शामल बनकर यांनी सांगितलं.