औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल होत आहेत. त्यांच्याकडे राज्य आणि केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याने आयटकच्यावतीने कामगारांचा देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी कामगारांनी आपल्या घरासमोर उभे राहून मूक निदर्शने केली.
केद्रीय कामगार संघटनासह आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, शहीद भगत सिंह हाॅकर्स युनियन, घरेलू कामगार संघटना, लाल बावटा रिक्षा युनियन व ऑल मराठवाडा कामगार युनियन तर्फे कामगारांनी आपल्या घराबाहेर येऊन मूक निदर्शने केली. देशव्यापी निषेध दिनअंतर्गत औरंगाबादेत रिक्षावाले, घरकाम करणाऱ्या महिला, कारखान्यातील कामगार, कंत्राटी कामगार, फेरीवाले यांनी मागणी कागदावर लिहून, तोंडाला मास्क लाऊन घरासमोरील रस्त्यावर उभे राहून मूक निदर्शने केली.
लॉकडाऊनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यवसायिक, शेतकरी हे सर्व अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. लॉकडाऊन काळातील वेतन कामगारांना द्यावे तसेच कोणतीही कामगार कपात करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही बहुसंख्य उद्योगांनी कायम कामगार व कंत्राटी, हंगामी कामगारांना वेतन दिले नाही. रोजचे उत्पन्न बंद झालेल्या गोरगरीब, कष्टकरी व स्थलांतरित कामगारांना व गरजूंना सरकारी गोदामात प्रचंड अन्नधान्य साठा असूनही पुरेसे व वेळेवर अन्न धान्य दिले नाही. त्यामुळे श्रमिक व गरीब माणसे उपासमारीला तोंड देत आहेत. पंतप्रधानांनी जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज फसवे असून त्यात अडचणीत असलेल्या कामगार, कष्टकरी, शेतकरी, असंघटित श्रमिक, यांना कुठलीही थेट मदत केलेली नाही. असा आरोप कम्युनिस्ट नेते अॅड. अभय टाकसाळ यांनी केला.
अशा आहेत मागण्या -
1. कायदे बदलून कामगारांचा घात करू नका.
2. कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करा.
3. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, त्यांना अन्नपाणी व औषध उपचार औषधोपचाराची व्यवस्था करावी.
4. प्राप्तिकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी.
5. सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी व व्यवस्थेसाठी जीडीपीच्या 5% खर्च द्या.
6. आरोग्य क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना प्राधान्याने शासकीय नोकरीत सामावून घ्या.
7. सर्व कामगारांचे वीजबील, मालमत्ता कर, पाणीपट्टी लाॅकडाऊन काळात माफ करा.
8. आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व कामगारांचा 50 लाखांचा विमा काढा.
या आंदोलनात कीरनराज पंडित, भगवान निकाळजे, गजानन ख॔दारे, राजु हिवराळे, विकास गायकवाड, संदीप पेढे, विजय रोजेकर, नईम खान यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.