औरंगाबाद - केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी देशातील विविध शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्रपक्ष वगळता सर्वच पक्षांनी भारत बंद आंदोलन केले. औरंगाबादमध्ये या भारत बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिसून आला. मात्र, दिल्लीगेट परिसरात आंदोलन आणि रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
भाजप वगळता सर्व पक्ष बंदमध्ये सहभागी -
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत भाजप वगळता सर्व पक्षांनी बंदला पाठिंबा दिला. दिल्ली गेट परिसरात डाव्या संघटनांनी आक्रमक आंदोलन केले. काहीकाळ रास्तारोको केल्याने वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पोलीस आंदोलकांमध्ये झटापटदेखील झाली. यानंतरही आंदोलकांनी पोलिसांचा विरोध न जुमानता घोषणाबाजी सुरूच ठेवली. पोलिसांनी जवळपास 50 आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कालावधीनंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार
सकाळ पासूनच बाजारपेठ बंद -
आजच्या बंदला कामगार संघटना, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, माथाडी संघटना, शेतकरी संघटना अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. सकाळपासूनच औरंगाबादच्या प्रमुख बाजार पेठांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद दिसून आला. बाजार बंद करण्यासाठी यावेळी राजकीय पक्षांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नाही. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहकांनी फिरवली पाठ -
शहरातील जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला चांगला प्रतिसाद दिसून आला. रोज स्वस्तात भाजीपाला घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी पाहायला मिळते. बंदच्या अनुषंगाने आज नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळाला. भाजीपाला विक्री करणारे शेतकरी आणि व्यापारी मंडईत आले होते. मात्र, ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने सर्वसामान्यांनी बंदला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
Bharat Bandh : महाराष्ट्रात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद -
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
राज्याची उपराजधानी नागपुरात भारत बंदचा कुठलाही प्रभाव दिसून आलेला नाही. मात्र, शीख समाजाकडून नागपूर कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. सोलापुरात या बंदला हिंसक वळण लागले. माकपच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी मारहाण केली. मुंबई शहरात भारत बंदचा खास परिणाम दिसून आलेला नाही. मुंबईतील बँकांचे व्यवहार नेहमीसारखे सुरू होते. बँकिंग जिल्हा या परिसरामध्ये सरकारी व खासगी बँकांची कार्यालये असून, भारत बंदचा कुठलाही प्रभाव येथील व्यवहारांवर आढळून आला नाही. मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये बहुजन समाज पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील रिगल सिनेमासमोर असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. मोदी हटाव देश बचाव, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. कृषी कायदे हे मुळात धनदांडग्या आणि मुठभर लोकांच्या हितासाठी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. जे कायदे आम्ही मागितलेच नाही, ते आमच्यावर का लादले गेले, असा सवाल शिवसैनिकांनी केला. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 15 टक्के मालाची आवक झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज पहाटेपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. बळीराजाला साथ देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा बंद होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी मापाडी, तसेच इतर घटकांनी शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन केले.