औरंगाबाद - शहराच्या पर्यटनास अधिक गतिमान करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे औरंगाबादेतून बंगळूरूमार्गे दिल्ली अशी विमान सेवा सुरू होणार आहे. याबाबत दानवे यांनी सातत्याने केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. अखेर या कामास आता मुहूर्त मिळाल्याने येत्या 25 नोव्हेंबरपासून ही विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली
विमानसेवेचे वेळापत्रक बिघडल्याने औरंगाबादसह मराठवाड्यातील विमान प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. तसेच याचा परिणाम ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील पर्यटनावरही झाला होता. याबाबत शहरातील विमान प्रवासी हॉटेल व्यवसायिक तसेच उद्योजकांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही अडचण व्यक्त केली होती. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उड्डाण मंत्रालयास सातत्याने पाठपुरावा करत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. या संदर्भात विमान मंत्रालयात 10 जुलै 2019 ला पुरी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांसह अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री दानवे यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले असून स्पाईस जेट औरंगाबाद-दिल्ली व औरंगाबाद-बंगळूरू विमानसेवा येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या विमान सेवेमुळे औरंगाबाद येथीलच नव्हे तर मराठवाड्यातील विमान प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - देशाचा जीडीपी दुसऱ्या तिमाहीत घसरून ४.९ टक्के होईल - एनसीएईआरचा अंदाज