औरंगाबाद - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे आणि संजय शिरसाठ यांच्यात चुरस होती. मात्र निकालानंतर सेनेचे संजय शिरसाठ यांनी हैट्रिक करत तब्बल 40 हजार मताधिक्याने विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय शिरसाठ व भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून नशीब आजमावणारे राजू शिंदे यांच्यात खरी लढत होणार असल्याचं चित्र होतं. राजू शिंदे यांनी 2 वर्षा अगोदरच पश्चिम मतदारसंघात कामे देखील सुरू केली होती. काटे की टक्कर या अर्थाने पश्चिम मतदारसंघाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. निवडणुकीचा निकालाची सर्वच उमेदवारांना धाकधुक लागली होती. पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आली होती. त्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. औरंगाबाद शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेना निर्विवाद बाजी मारत आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी विजयाची हैट्रिक करत या मतदारसंघाचे आमदार म्हणून कायम राहिले आहेत. शिरसाठ हे 40 हजार मताधिक्याने विजयी झाले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात अत्यंत संथगतीने मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे संजय शिरसाठ आघाडीवर होते. मतांची आघाडी कायम ठेवत संजय शिरसाठ यांनी आपला विजय मिळविला.