औरंगाबाद - देशी दारू तयार करणारा कारखाना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव शिवारात मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत तीन जणांना अटक केली आहे. संजय भागवत, महेश भागवत आणि योगेश डोंगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून तीन वाहनांसह 63 लाख 83 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे आणि कर्मचारी खुलताबाद आणि कन्नड तालुक्यात पाहणी करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गल्लेबोरगाव शिवारात संजय भागवत आपल्या शेतात स्पिरिटच्या माध्यमातून दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मध्यरात्री 3 च्या सुमारास सापळा रचून शेतात छापा टाकला असता काही जण उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहून काही जणांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून संजय भागवत, महेश भागवत आणि योगेश डोंगरे या तिघांना ताब्यात घेतले.
या तिघांना घेऊन पोलिसांनी शेतात असलेल्या गोडाऊनची झडती घेतली असता दारू तयार करण्याच्या साहित्यासह 18 ड्रम स्पिरिट, तयार दारूचे 79 बॉक्स, प्लास्टिकच्या दोन टाक्यांमध्ये एक हजार लिटर दारू, दोन पॅकेजिंग मशीन, दोन मिक्सर मशीन, एक फिलिंग मशीन, विविध कंपन्यांच्या नावाचे बनावट देशी दारूचे स्टिकर, पॅकेजिंग कॅप, काही रिकामे बॉक्स आढळून आले. या साहित्यासह एक ट्रक, दोन चारचाकी गाड्या आणि दोन दुचाकी असा 63 लाख 83 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस करत आहेत.