औरंगाबाद - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा क्रांतीमोर्चा तर्फे मशाल यात्रा काढत क्रांतिचौक भागात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी पोलीस परवानगी घेतली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांतीमोर्चाच्यावतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला समर्थन म्हणून सकाळी अंबड ते औरंगाबाद असा मशाल मोर्चा काढण्यात आला. क्रांतिचौक भागात ठिय्या आंदोलन करत मोर्चाची सांगता करण्यात आली. आरक्षणासह इतर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू, असेल असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
औरंगाबादच्या सीमेवर पोलिसांनी अडवल्या गाड्या -
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंदोलकांच्या निघालेल्या गाड्या पोलिसांनी औरंगाबादच्या सीमेवर अडवल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. मशाल मोर्चा घेऊन गाड्यांचा ताफा औरंगाबादच्या क्रांती चौकाकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे अर्धे आंदोलक शहरात प्रवेश करू शकले नाहीत. उर्वरित आंदोलकांनी क्रांती चौक परिसरात आंदोलन सुरू केले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कितीही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला.
नोकर भरती रद्द करावी -
मराठा आरक्षणासाठी 42 बांधवांनी आपले बलिदान दिले. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 13 हजार 726 तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. सारथीला न्याय मिळाला नाही. तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही नाय मिळालेला नसताना, आरक्षणामधून नियुक्त झालेल्या एमपीएससी व इतर विभागाच्या तरुणांना नोकऱ्यात समजावून घेतले नाही. या सर्व मागण्यांसह जुनी नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आली.