औरंगाबाद - डेल्टा प्लस या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाउन आहे. परंतु रविवार (दि. ४)रोजी पहाटे जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील हे एका रिसॉर्टमध्ये कव्वाली कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, कोरोना नियमांना धाब्यावर बसवून हा कार्यक्रम मोठ्या जोशात पार पडला. त्यामुळे खासदारासारख्या जबाबदार व्यक्तीने असे नियम मोडले, तर सामान्य लोक काय करतील असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.
सुमारे २०० ते ३०० लोक सहभागी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना, ओसरते तोपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येणार असल्याची तज्ञांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंडला लॉकडाउन घोषीत केला आहे. या लॉकडाउनचे सर्वसामान्य नागरीक पालन करत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील खासदार इम्तियाज जलील हे दौलताबाद येथील एका रिसॉर्टमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सुमारे २०० ते ३०० लोक सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे कसलेही पालन करण्यात आले नाही.
स्वतः खासदार विनामास्क
कव्वालीच्या या कार्यक्रमात इतर लोकांनी तर नाहीच मात्र, स्वतः खासदार इम्तियाज जलील यांनीही मास्क लावला नव्हता. तसेच, या कव्वाली कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी देखील नव्हती. विना परवानगी हा कार्यक्रम दौलतबात येथील एका रिसॉर्टमध्ये सुरू होता. दरम्यान, परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. श्वास घेण्यासाठी मास्क नाही घातला तरी पोलीस सामान्य लोकांकडून दंड वसूल करतात. काही ठिकाणी बेदम मारहान करतात. आता खासदार मोहदयांना पोलीस काय शिक्षा करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत.