औरंगाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वच विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेने त्यांच्या राडा स्टाईलमध्ये उपायुक्तांवर खुर्ची उगारत प्रशासनाचा निषेध नोंदवला. मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी महानगरपालिका उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत गैरवर्तन केले. हे प्रकरण चिघळत असल्याचे कळताच पोलिसांनी मध्यस्थी करत दाशरथे यांना दालनाच्या बाहेर नेले. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात कोरोनाचे दररोज 200 पेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. या परिस्थितीला औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन दोषी असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत जाऊन संताप व्यक्त केला.
शहरात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तुम्ही झोपा काढत आहात का? असा सवाल सुहास दाशरथे यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना विचारला. त्यावर निकम यांनी दाशरथे यांना उत्तर देण्याऐवजी आयुक्त नसल्याचे सांगितले, त्यामुळे दशरथे संतापले व त्यांनी उपायुक्तांवर खुर्ची उगारली. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी मध्यस्थी करत दशरथे यांना दालनाच्या बाहेर नेले. महापालिकेने दोन दिवसात योग्य उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला. या वेळी दाशरथे यांच्यासोबत संदीप कुलकर्णी, अमित भांगे, गजन गौडा पाटील, प्रविण मोहिते, वृषभ रगडे, अमित दायमा हे उपस्थित होते.