औरंगाबाद - शहरात पाण्याची नवी योजना आणण्यात कोणताही श्रेयवाद नाही. शहरात पाणी योजना आणण्यात भाजपचा वाटा मोठा असल्याचे बोलले जात आहे. त्यात आमचा देखील सहभाग असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कार्याचा लेखोजोखा मांडला. यावेळी ते बोलत होते.
महापालिका हद्द वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हद्दीत आलेल्या 18 गावांचा विकास म्हणावा तसा करू शकलो नाही हे मान्य आहे. मात्र, आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी नवा डीपीआर तयार करणार आहोत. त्यासाठी भरीव निधीची गरज असल्याचे घोडेले म्हणाले.
कर वसुलीसाठी मोठे प्रयत्न महानगर पालिका करत आहे. त्याप्रमाणे वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महानगर पालिकेचा रोजचा खर्च पाहता वसुली वाढवणे गरजेचे आहे. त्यामध्ये हलगर्जीपणा सहन करणार नसल्याचे ते म्हणाले. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवला. तसेच शहर बस सेवा, शंभर कोटींचे रस्ते, 37 कोटींचे पथदिवे, असे काम त्यांच्या कार्यकाळात झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी एक कोटींची निविदा असून प्रस्ताव तत्वतः मान्य केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होईल. 72 कामांपैकी अजून जवळपास 15 काम सुरू आहेत. ठेकेदारांचे थकीत वेतन देण्याबाबत कोल्हापूरमध्ये महापालिका आर्थिक संकटात असताना सरकारने मदत केली होती. त्या धर्तीवर सरकारकडून मदत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.
संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक अडचणीत येत आहेत. दोन कोटींचे काम ८ कोटींपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या कामात देखील सरकारची मदत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भूमिगत गटार योजना आणि इतर योजना यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम केले असल्याचे नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.