औरंगाबाद - कन्नड़ तालुक्यातील देवळाना येथे 26 वर्षीय महिलेचा व तिच्या अडीच वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल 10 दिवसांच्या उपचारांनंतर निगेटिव्ह आला. आता या मायलेकींना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे कोरोनावर मात केल्याबद्दल अभिनंदन करत त्यांना निरोप दिला.
या मायलेकींचा कोरोना अहवाल 10 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. तालुक्यात कोविडचा रुग्ण सापडल्यामुळे घबराट पसरली होती. या दोघींना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कन्नडवासियांच्या जिवात जीव आला आहे. या दोघींना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. कन्नडसारख्या ग्रामीण भागात कोविडवर उपचार करून यशस्वीरीत्या मात करण्यात आल्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
देवळाना येथील या मायलेकींना रुग्णालयातून घरी सोडतेवेळी तालुक्याचे आमदार उदयसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देवगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी त्यांचा सत्कार केला. कोरोनामुक्त झालेल्या 26 वर्षीय महिला व तिच्या अडीच वर्षाची मुलीवर पुष्पवृष्टी करत टाळ्या वाजवून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आदींसह नागरिक उपस्थित होते.