औरंगाबाद - औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून 10 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामध्ये प्रमुख पक्षांमधील काही बंडखोरांनी बंड मागे घेतले तर काही उमेदवारांनी बंड कायम ठेवले आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 35 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं.
बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादीला यश तर भाजपला अपयश -
पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकीत भाजपसह महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केले. जवळपास पाच दिवस बंडखोरांनी बंड मागे घेण्यासाठी अधिकृत उमेदवार आणि पक्षातील नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रयत्न सुरू होते. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी थांबण्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं असलं तरी भाजपमधील बंडखोरी कायम आहे. राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षातील विजेंद्र सुरासे तर युवासेनेचे अक्षय खेडकर यांची समजूत काढली आहे. तर भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतली असली तर त्यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीचं काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर बीडचे रमेश पोकळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत येणार हे मात्र नक्की.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.
- उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार -
1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद
2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड
3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद
4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद
5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड
6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना
7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर
8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद
9) संजय शहाजी गंभीरे ,बीड
10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.