औरंगाबाद - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासन करत आहे. मात्र, एका कोरोना संशयित रुग्णाने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा भांडाफोड केला आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना त्रास झाला तर कोणताही वैद्यकीय कर्मचारी जवळ नसल्याचा दावा दाखल झालेल्या संशयित रुग्णाने व्हिडिओ तयार करून केला आहे.
औरंगाबादमधे गेल्या दोन दिवसांपूर्वी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भरती केले जाते आहे. सिडको येथील बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. अहवाल अद्याप आला नसला तरी त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुगणालय कोरोनासाठी आरक्षित करण्यात आले आहे. इथे सर्व सोयी उपलब्ध असल्याचं बोलले जात आहे.
मात्र, प्रत्यक्षात रुग्णांसाठी कुठलीच सोय नसल्याचा दावा दाखल झालेल्या या रुग्णाने केला आहे. या नातेवाईकाला दाखल केलेल्या कक्षाजवळ स्वच्छता नाही. बाजूच्या कक्षातील रुग्णाला घरी सोडल्यावर तिथे स्वच्छता करायला हवी, मात्र तसे झाले नाही. ज्या ठिकणी या संशयिताला ठेवण्यात आले तिथून रुग्णालयाचे डॉक्टर किंवा कर्मचारी खूप दूर आहेत. आवश्यकता पडली तर कोणीही मदतीला नाही असे या रुग्ण नातेवाईकाने केलेल्या व्हिडिओतून समोर येते. बधिताच्या नातेवाईकाने केलेला दावा जर खरा असेल तर कोरोनाबाबत नागरिक गंभीर नसताना प्रशासन देखील गंभीर नसल्याचे चित्र आहे.