औरंगाबाद - जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली झाली आहे. त्यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे आदेश प्राप्त झाले आहेत.
उदय चौधरी यांनी 19 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांची प्रशासकीय सेवेची सुरुवात 22 ऑगस्ट 2012 रोजी गडचिरोली येथून सहायक जिल्हाधिकारी पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धा आणि ठाणे येथे काम केले. औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी येण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
मार्च महिन्यात उदय चौधरी यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने त्यांची बदली तात्पुरती रद्द करण्यात आली. गेल्या दोन वर्षांमध्ये सरकारी योजना ग्रामीण भागात पोहचवण्याचे काम त्यांनी केले. तर, समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादीत करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. सोमवारी सायंकाळी बदलीचे आदेश प्राप्त होताच आता औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी कोण, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.