छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : महानगरपालिकेत वडिलांच्या जागी नोकरी मिळावी, म्हणून मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक राज्यश्री आडे यांच्या टीमसह गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अवघ्या ३ दिवसात या गुन्ह्याचा उलगडा केला.
सफाई कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला : प्रभाकर आहिरे यांच्यावर 31 जुलै रोजी गोळीबार झाला होता. प्रभाकर आहिरे हे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरीला होते. ते आता निवृत्त झाले आहेत. प्रभाकर आहिरे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. एका सफाई कर्मचाऱ्याचे कोणासोबत वैर असेल,असा प्रश्न नागरिकांसह पोलिसांनाही पडला होता. या गुन्ह्याचा उलगडा कसा करायचा, असा प्रश्नही पोलिसांसमोर होता. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. प्रभाकर आहिरे यांच्या घरात मारेकरी येताना आणि त्यांच्यावर गोळीबार करत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. परंतु त्याआधारे धागेदोरे जोडणे पोलिसांना अवघड जात होते. तरीही पोलिसांनी 3 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा केला आणि मुख्य आरोपीसह 2 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.
मुलगाच निघाला मारेकरी : महानगरपालिकेत साफसफाई कर्मचारी असलेले प्रभाकर अहिरे एप्रिल महिन्यात निवृत्त झाले आहेत. वडिलांच्या जागी आपल्याला नोकरी मिळावी, अशी इच्छा त्यांचा मुलगा महादू आहिरेची होती. मात्र प्रभाकर आहिरे यांना 3 पत्नी आहेत आणि त्यांना 13 अपत्य आहेत. प्रभाकर आहिरे हे शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या पत्नीसोबत राहत होते. तिला पहिल्या पतीपासून 2 मुले आणि 2 मुली होत्या. प्रभाकर आहिरे त्यांचाही संभाळ करत होते. तर महादू हा प्रभाकर यांचा सर्वात मोठा मुलगा होता. प्रभाकर आहिरे इतर मुलांचाही संभाळ करत होते. यामुळे आपल्याला महानगरपालिकेत नोकरी मिळणार नाही, अशी खात्री आरोपी महादूला होती. त्यामुळे वडील जर जगात नसले तर मोठा मुलगा म्हणून नोकरी आपोआप आपल्याला मिळेल, असे त्याला वाटत होते. यामुळे त्याने इतर दोन जणांना सोबत घेऊन वडिलांच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली.
५५ हजारांचा अॅडव्हान्स : महादूला काही करून वडिलांच्या जागेवर नोकरी मिळावायची होती. आपल्याला नोकरी मिळवून द्यावी, असे महादूने वडिलांनाही सांगितले होते. परंतु प्रभाकर आहिरे त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच वडिलांना संपवून नोकरी मिळवायची असा कट त्याने रचला. यासाठी त्याने सचिन भास्कर अंभोरे आणि नंदकिशोर परसराम अंभोरे यांना वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. महादूने सचिन अंभोरेला वडिलांच्या हत्येसाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. त्यासाठी गावठी कट्टा आणण्यासाठी महादूने 55 हजार रुपयांचा अॅडव्हान्स मारेकऱ्यांना दिला.
यादिवशी केला हल्ला : मारेकरी सचिन अंभोरे आणि नंदकिशोर यांनी प्रभाकर आहिरे यांच्यावर 8 दिवसांपासून पाळत ठेवली. हत्येचा प्लान तयार झाल्यानंतर मारेकऱ्यांनी 31 जुलै रोजी दुपारच्या सुमारास प्रभाकर आहिरेंवर हल्ला करण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी दोघेही प्रभाकर आहिरेंच्या घरात घुसले. त्यांनी प्रभाकर आहिरेवर दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. प्रभाकर आहिरे यांचे दैव बलवत्तर असल्याने ते या हल्ल्यातून बचावले.
हेही वाचा-