औरंगाबाद - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात दहा दिवसांचा बंद पाळला जाणार आहे. या बंदला खासदार इम्तियाज जलील यांच्यासह व्यापाऱ्यांचा विरोध होत आहे. मात्र जिल्ह्यात मिनिटाला एक रुग्ण आढळून येत असून सर्व बाबींचा विचार करून नियमानेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
लोकप्रतिनिधींची झाली बैठक
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री 30 मार्च ते 8 एप्रिल काळात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. मात्र सलग तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन एक दिवसासाठी पुढे ढकलण्याची मागणी केली. त्याचबरोबर निर्णय घेताना लोकप्रतिनिधीना विचारात घेतले नाही, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांच्यासह आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि जिल्हापरिषदेतील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी बंद बाबत आपल्या सूचना मांडल्या, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंद बाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
बंदसाठी यंत्रणा सज्ज
31 मार्च ते 9 एप्रिल काळात लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊनसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हा बंद गरजेचा आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या पाहता मिनिटाला एक नवीन रुग्ण आढळून येत आहे. ही साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. बंदच्या काळात प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेत पेट्रोल पंपाबाबत आणि निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठीच आहे. त्यामुळे निर्णयाला विरोध करण्याचे गरज नाही, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले.