औरंगाबाद - रेमडेसिविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्ण व नातेवाइकांना होणार त्रास याबाबत प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांच्या खंडपीठाने गुरुवारी सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ॲड. सत्यजित बोरा यांची औरंगाबाद खंडपीठाने सदर याचिकेत ॲमिक्यस क्युरी म्हणजेच न्यायालयाचे मित्र म्हणून नेमणूक केली आहे.
वर्षभरापासून जनता कोरोनाचा सामना करत आहे. एक वर्षापासून निर्माण झालेल्या परिस्थितीचीही दखल यापुर्वी खंडपीठाने घेतलेली होती. त्यासंदर्भात वेळोवेळी निर्देशही दिले. त्यानंतर अचानक दुसरी लाट आली आणि आरोग्य यंत्रणेबाबत अनेक अडचणी समोर आल्या. रेमडेसिविरचा तुटवडा त्यात होणारा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड उपलब्ध नसल्याच्या समस्या पुढे आल्या. त्याची दखल आता औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे. ॲड. बोरा याविषयीची जनहित याचिका न्यायालयात सादर करतील. याचिकेवर २६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.
रुग्णांसाठी ऑक्सिजनचे उपलब्ध वेळेवर व्हावी यासाठी काय प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत? याची विचारणा या याचिकेत खंडपीठाने केली आहे. खासगी रुग्णालय रुग्णांना दुसरीकडे नेत असताना रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे योग्य नियोजन ठेवावं, अशी अपेक्षा याची कधी व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचारांबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने देखील याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर 23 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात स्थानिक विषयाच्या अनुषंगाने सुनावणी घेतली जाणार आहे. या याचिकेत न्यायालयाची मित्र म्हणून ॲड. सत्यजित बोरा हे काम पाहत आहेत.