औरंगाबाद - लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी २३ एप्रिलला उद्या मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप केले. औरंगाबाद जिल्ह्यात ९ विधानसभा मतदान केंद्रांमध्ये जिल्हाप्रशासनाने निवडणूक साहित्याचे वाटप केले. त्यापैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर ३ विधानसभा क्षेत्र हे जालना लोकसभा क्षेत्रात येतात.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक विधानसभानिहाय निवडणूकीचे साहित्य वाटप करण्यात आले. मतदान अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्राप्रमाणे साहित्य तपासून देण्यात आले. मतदान साहित्य मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी बससह खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास २५० पथके तयार करण्यात आली आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून २३ तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. सायंकाळी ६ च्या आधी आलेल्या मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.