औरंगाबाद - कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांच्या अपयशानंतर कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अहमदनगर जिल्ह्यातील 19 गावांवर कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आला आहे.
बुधवारी दिवसभर केलेल्या प्रयोगात एक तास या विमानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. या एका तासात 38 एरोसोल्स म्हणजेच रसायनाच्या कांड्या वापरून ढगांमध्ये फवारणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 9 ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. जवळपास पाच वेळा विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मात्र, पाणीदार ढग आढळून आले नाहीत. मंगळवारी पाणीदार ढग मिळाल्याने जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे एरोसोल्सच्या सहा नळकांड्या फवारण्यात आल्या होत्या.
त्याचप्रमाणे बुधवारी जालना आणि अहमदनगर जिल्ह्यातील 19 गावांवर 38 नळकांड्या फवारण्यात आल्या. त्याठिकाणी पाऊस पडल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. फवारणी केलेल्या गावांमध्ये अंबड तालुक्यातील रुई, बाबा दर्गा, परंडा, घनसावंगी, पिरगईवाडी, ममदाबाद, कारला, गुरुपिंप्री, खोदेपुरी, भीलपुरी तर अहमदनगर जिल्ह्यातील खोरदगाव, मोहरी, पाथर्डी, वासू, अमरापूर या गावांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रयत्नांमध्ये नेमका किती पाऊस पडला हे अद्याप कळलेले नाही.